नेत्रदान संकल्प पत्र
(मरणोत्तर नेत्रदानासाठी इच्छा पत्र)
नेत्रदा नेत्रपेढी
डॉ. बापये हॉस्पिटल आय बँक, नाशिक
फोन : ०२५३ - २५०६५०५, २५०९४२१
मी स्वखुशीने असे जाहीर करतो / करते की, मला मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा आहे. माझ्या मृत्युनंतर माझे डोळे गरजू अंध व्यक्तीमध्ये आरोपण करणेकामी / नेत्रसंशोधनासाठी डॉ. बापये हॉस्पिटल आय बँक, नाशिक यांना नेत्रदानास संमती देत आहे. माझ्या नातेवाईकांना याची पूर्वकल्पना दिली आहे.
⑆ नेत्रदान - सर्वश्रेष्ठ दान ⑆
डॉ. मनीष बापये
नेत्रदा (डॉ.बापये हॉस्पिटल) नेत्रपेढी, नाशिक
जीवनतील एकमेव शाश्वत गोष्ट म्हणजे मृत्यू. इहलोकाची यात्रा संपवून पंचमहाभूतात आपला देह विलीन होताना आपले अवयव दान करण्याइतके पुण्य कर्म दुसरे असू शकत नाही. प्रत्येक मन्युषाने करावे असे हे कर्म बर्याच वेळा अनेक कारणांनी होवू शकत नाही. शरीरातील सर्व अवयवांमधील दान करण्यास सहज शक्य असा अवयव म्हणजे डोळे होय. मृत्यूनंतर ६ तासांपर्यंत नेत्रदान करता येते, त्यामुळे अगदी अचानक/ अपघाती मृत्यू नंतरही अप्तेष्ठानच्या समतीने ते करता येवू शकते.
या लेखामध्ये नेत्रदानाबद्दल जनजागृती करण्याबरोबरच समाजात असलेले गैरसमज दूर करणे हा उद्देश आहे.
जागतिक पातळीवर अंधत्वाचे सर्वात महत्वाचे कारण हे मोतीबिंदू आहे. परंतु त्याच बरोबर बुब्बुळाच्या विकारामुळे येणारे अंधत्व हे देखील महत्वाचे, टाळता येवू शकणारे व उपाय करता येणे शक्य असणारे कारण आहे. आजमितीला आपल्या देशात अश्या रुग्णांची संख्या साधारण सव्वा ते दीड लाखाच्या घरात आहे. दर वर्षी त्यात २५ ते ३० हजार रुग्णांचा समावेश होतो. ह्या रुग्णांना नेत्रदान केलेल्या डोळ्यांची गरज असते. २०१३ साली संपूर्ण भारतात केवळ ५३५४३ डोळे नेत्रदानाने मिळवले गेले होते. महाराष्ट्रात हि संख्या फक्त ७५०३ इतकीच होती. ही आकडेवारी दर्शवते कि आपल्या देशात गरजेपेक्षा नेत्रदान अत्यल्प प्रमाणात होते व ते वाढण्याची नितांत गरज आहे.
ज्याप्रमाणे घड्याळाच्या तबकडीवर संरक्षक काच असते, त्याचप्रमाणे डोळ्यामध्ये संपूर्ण पारदर्शक पटल असते. हे पटल म्हणजेच बुब्बुळ होय. आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे बघतो तेव्हा त्यापासून येणारे प्रकाश किरण बुब्बुळाने फोकस केले जातात आणि दृष्टी प्राप्त होते.
काही कारणाने बुब्बुळ अपारदर्शक झाल्यास साहजिकच दृष्टी जाते. याची अनेक कारणे आहेत. डोळ्याला होणारी इजा, बुब्बुळाला होणारा जंतू प्रादुर्भाव (corneal infection/ulcer), कुपोषण, डोळ्यामध्ये चुना अथवा इतर केमिकल गेल्याने, अनुवंशिकता हि त्यातील काही महत्वाची कारणे आहेत. ग्रामीण भागात हे विकार शहरांपेक्षा अधिक दिसून येतात. ह्या सर्व रुग्णांना नेत्रदानाचा उपयोग होवू शकतो.
नेत्रदान फक्त मृत्युनंतर करता येवू शकते. किडनीप्रमाणे नेत्रदान जिवंतपणी करता येत नाही. परंतु मृत्युनंतर नेत्रदान कोणीही करू शकतात. बालकांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वाना नेत्रदान करता येवू शकते. ज्यांना चष्मा आहे किंवा डोळ्याची शत्रक्रिया झालेली आहे त्यांना, ज्यांना डायबेटीस, उच्च रक्तदाब आहे अशा व्यक्तींना नेत्रदान करता येवू शकते. शरीरातील कॅन्सर डोळ्यात पसरला नसल्यास नेत्रादान करता येते.
नेत्रदान करण्यासाठी आपल्या हयातीत कुठल्याही नेत्रपेढी बरोबर रजिस्टर करणे अत्यावशक नाही. नेत्रदानची इच्छा आपल्या आप्तेष्टांना कळवली तरी नेत्रदान करता येते. निवर्तलेल्या व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा दाखवली नसेल परंतु आप्तेष्टांना ते करावयाची इच्छा असेल तरीही ते करता येते. नेत्रदानाच्या पुण्याकार्माला कोणत्याही धर्माचा आक्षेप नाही.
काही विशिष्ठ परिस्थितीत मात्र नेत्रदान करता येत नाही. यामध्ये एड्स, हिपटायटीस, रक्तातील जंतूस्त्राव (सेप्टीसेमिया), रक्ताचे किंवा डोळ्याचे कॅन्सर यांचा त्यात समावेश होतो. हे रोग नेत्रारोपणानंतर त्या रूग्णा मध्ये संक्रमित होण्याची शक्यता असल्याने अशा व्यक्तींचे डोळे घेता येत नाहीत.
नेत्रदान करण्यावेळी काही गोष्टी गरजेच्या आहेत. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर लवकरात लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधावा जेणे करून नेत्रादान कमीत कमी वेळात होवू शकेल. देह ज्या खोलीत ठेवला आहे तेथील पंखा बंद करावा. डोळे बंद करून त्यावर ओला कापूस किंवा रुमाल ठेवावा. रुग्णाच्या डॉक्टरना संपर्क साधून मृत्यूचा दाखला तयार ठेवावा.
नेत्रपेढीचे डॉक्टर संपर्क झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर येवून रुग्णाच्या डोळ्याची बुब्बुळे घेवून जातात. तपासणीसाठी थोडे रक्तदेखील घेतले जाते. नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होत नाही.
नेत्रदानापूर्वी रुग्णाच्या आप्तांची परवानगी लेखी स्वरुपात घेणे अनिवार्य असते. तशी परवानगी न मिळाल्यास नेत्रदान होवू शकत नाही. दान केलेले डोळे सुरक्षित माध्यमातून नेत्रपेढीमध्ये नेले जातात. तेथे त्यांची तपासणी करून, योग्य त्या गरजू रुग्णांमध्ये त्याचे आरोपण शस्त्रक्रियेने केले जाते. एका नेत्रदानातून मिळवलेल्या डोळ्यांचे २ रुग्णांवर नेत्ररोपण केले जाते.
नेत्ररोपण कोणावर केले गेले हि माहिती गोपनीय असते व ती माहिती नेत्रादात्याच्या आप्तजनाना देता येवू शकत नाही. त्याच प्रमाणे दान केलेले डोळ्यांचे आरोपण कोणावर करावे हे निर्णय नेत्रादात्याच्या आप्तजनाना घेता येवू शकत नाही. डोळ्यांच्या प्रतीप्रमाणे गरजू रुग्णाच्या प्रतीक्षा यादीतील २ योग्य त्या कोणत्या रुग्णांवर त्याचा वापर करावा हा निर्णय नेत्रचिकित्सक घेतात.
आजमितीला जगात सर्वाधिक नेत्रदान श्रीलंका या आपल्या छोट्या शेजारी देशात होते. सर्व जगभर हे डोळे गरजू रुग्णांना हा देश पुरवतो. या कामाची सुरुवात डॉ. हडसन सिल्वा यांनी १९५० च्या दशकात सुरु केली. त्यांच्या अथक परिश्रमांनी आज नेत्रदानाच्या कार्यात श्रीलंका जगात अग्रेसर आहे. जर हा छोटा देश नेत्रदानाचे काम एवढ्या मोठ्या प्रमाणावर करू शकतो तर १०० कोटी लोकांच्या आपल्या देशात ते सहज शक्य होवू शकेल.
आपले डोळे आपल्या मृत्युनंतर २ लोकांना नजर देवू शकतात. इहलोकाचा प्रवास संपविताना हे पुण्यकर्म करण्याची संधी सोडू नका. नेत्रदान करा.